Translate

Tuesday 30 May 2017

How to select career?



करिअर कसे निवडावे?

            इ. 10 वी, 12 वी च्या टप्प्यावर प्रत्येकच पालक व विद्यार्थी यांच्यापुढे मोठा प्रश्न असतो की आता पुढे काय करायचे? सायन्सला जाऊन इंजिनिअरिंग, मेडिकल करायचे की कॉमर्सला जाऊन सी.ए., व यासारखे काही करायचे, कि आर्टस् ला जाऊन स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करायचा... वगैरे वगैरे अनेक पर्याय शोधले जातात. बरेचदा आई-वडिलांना त्यांच्या तत्कालिन परिस्थितीमुळे जे करायला जमले नाही ते आपल्या मुलांनी करावे व त्याद्वारे आपले स्वप्न पूर्ण करावे असे भावनिक विचारही केले जातात. याचप्रमाणे एखाद्या करिअर मध्ये खूप पैसा मिळतो, मान-सन्मान, प्रतिष्ठा मिळते म्हणून ते करिअर निवडण्याचा निर्णय घेतला जातो.
      खरे तर, केवळ भावनिक पातळीवर विचार करुन, स्वप्नरंजन करुन करिअर निवडणे जसे चुकीचे आहे तसेच केवळ पैशाकडे, आर्थिक उत्पन्नाकडे बघून, प्रतिष्ठेकडे बघून करिअर निवडणे चुकीचे आहे. अगदी याचप्रकारे केवळ 10 वी, 12 वी च्या गुणांच्या आधारे करिअर निवडणे हे देखिल व्यावहारिक ठरत नाही.
            10 वी, 12 वी नंतर करिअर अर्थात शैक्षणिक दिशा निवडतांना पालकांनी आपल्या मुलांची कपॅसिटी नेमकी काय आहे याचा विचार करावा. आपला मुलगा / मुलगी कशात चांगला आहे, त्यात कोणकोणत्या क्षमता आहेत, त्याची बौध्दिक पातळी कशी आहे या गोष्टींचा प्राधान्याने विचार करावा. उदा. आपल्या मुलाची गणिताची क्षमता, किंवा गणितातील समज साधारण आहे हे माहीत असुनही आपण त्याला इंजिनिअरिंगला पाठविण्याचा विचार करणं, हट्ट करणं योग्य नाही. प्रत्येक नोकरी-व्यवसायात यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाशी निगडीत काही विशिष्ट क्षमतांची गरज असते, अशा क्षमता नसतांना त्या करिअरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला गेला तर अपयशाची जशी दाट शक्यता असते तशीच तो विद्यार्थी दीर्घकाळासाठी वैफल्यात, ताण-तणावात राहण्याची अधिक शक्यता असते. या ताण-तणावातून त्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावरही विपरित परिणाम होतो व त्यामुळे त्याला दुसरे जे काही चांगले जमले असते, जे काही इतर करण्याची त्याच्यात क्षमता होती त्यात देखिल तो पुढे करिअर करू शकत नाही इतके त्याच्या आत्मविश्वासाचे खच्चिकरण होते. म्हणूनच विद्यार्थ्याच्या नेमक्या क्षमता ओळखून, तपासून त्या क्षमता ज्या नोकरी-व्यवसायाशी निगडीत आहे ते करिअर निवडावे.
      करिअर निवडीत दुसरा महत्त्वाचा घटक ठरतो, तो म्हणजे विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व व स्वभाव गुण. उदा. काही मुलांना चारचौघात, समुहात राहण्यात आनंद वाटतो तर काहींचा एकट्याने काम करण्याचा पिंड असतो, काही मुले खूप बोलके असतात, तर काही कमी बोलून आपापले काम प्रामाणिकपणे पूर्ण करण्याला प्राधान्य देतात. काहींची ताण सहन करण्याची पातळी खूप कमी असते, थोड्याशी तणावाच्या परिस्थितीतही ते पटकन कोलमडतात, चीडचीड करतात तर काहींना कितीही मोठा ताण आला तरी ते शांतपणे, खंबीरपणे त्याचा सामना करुन त्यातून मार्ग काढतात. काही मुलांना वेगवेगळ्या कल्पना सुचतात, प्रत्येक वेळी ते वेगळा विचार मांडतात, नाविन्यपूर्ण पध्दतीने एखाद्या समस्येचे उत्तर शोधतात, काही मुले पारंपरिक पध्दतीनेच विचार करतात, काहींचा आत्मविश्वास दांडगा असतो इ. असे अनेक व्यक्तिमत्व व स्वभावगुण असतात. व्यक्तिभिन्नतेच्या नियमाप्रमाणे प्रत्येक व्यक्तीमध्ये हे गुण वेगवेगळे आढळतात, त्यांचे प्रमाण देखिल कमी-अधिक असते. जसे प्रत्येक व्यवसायाशी निगडीत क्षमता असतात तसेच प्रत्येक व्यवसायाशी निगडीत व्यक्तिमत्व व स्वभावगुण देखिल असतात. उदा. शिक्षक हा जसा आपल्या विषयात अभ्यासू पाहिजे तसेच त्याच्याजवळ वक्तृत्व कलाही असली पाहिजे, तो बोलका असला पाहिजे. मात्र संशोधन क्षेत्रात काम करणारी व्यक्ती बोलकी नसली तरी चालेल, त्याऐवजी त्याकडे एकाग्रतेने दीर्घकाळ काम करण्याचा गुण असावा, तार्किक क्षमता असावी तरच तो यशस्वी होऊ शकतो. थोडक्यात, मुलांमधील व्यक्तिमत्त्वाचे प्रबळ स्थाने व दुर्बल स्थाने, त्यांच्यातील कमतरता ओळखाव्यात व त्या आनुषंगाने करिअर निवडीला प्राधान्य द्यावे.
      याचप्रमाणे मुलांच्या काही विशेष आवडी-निवडी असतात. मुलांना कोणकोणत्या गोष्टीत रूची आहे व कशात नाही याचाही विचार केला जावा. काहींना निबंध लेखनाची आवड असते, कविता करण्यात रुची असते, काहींना एखादे यंत्र कसे काम करते हे समजून घेण्यात मजा वाटते. काहींना चित्रकलेत आवड असते. अशा त्याच्या आवडी-निवडी, त्याच्यातील क्षमता आणि व्यक्तिमत्व गुण यांची सांगड घालून करिअर निवडले गेले तर त्यात यशस्वी होण्याची जशी शक्यता वाढते त्याचप्रमाणे त्या कामात दीर्घकाळ कार्य-समाधान मिळण्याचीही खात्री बळावते. महत्वाचे म्हणजे आपल्या आवडीप्रमाणे मिळालेल्या कामात आनंद, मानसिक स्वास्थ्य अधिक व ताण-तणाव, वैफल्य कमी असे सुरेख समिकरण बघायला मिळते.
      याचप्रमाणे आपणास करिअर नेमके का करायचे आहे? भरपूर पैसा मिळविण्यासाठी की आपल्यातील सुप्त कला गुणांचा आविष्कार करण्यासाठी? पैसा कमी मिळाला तरी चालेल पण श्रम जास्त नको अशी आपली वृत्ती आहे का? समाजाच्या भल्यासाठी, किंवा देशाचे नाव मोठे करण्यासाठी आपणास करिअर करायचे का? जास्त ताण नको, दगदग नको, आरामाची नोकरी पाहिजे, कौटुंबिक स्वास्थ्य जपता आले पाहिजे, असा जॉब हवा का? चारचौघात राहून काम करण्याचा आनंद मिळवायचा का? फिरस्तीचा जॉब जमेल का? पैशापेक्षा प्रतिष्ठा अधिक महत्वाची वाटते का? यासारखे आत्मपरीक्षण देखिल विद्याथ्याने प्रामाणिकपणे करावे. करिअर मधील आपली नेमकी उद्दिष्ट्ये समजून घ्यावीत व त्या अनुषंगाने करिअर निवडीचा विचार व्हावा.
      सरते शेवटी, ज्या करिअरमध्ये मुलांना आपण टाकणार आहोत त्याकरिताचा आर्थिक भार आपणास पेलवेल की नाही याचाही पालकांनी विचार करावा. आपल्या आर्थिक आवाक्यापलिकडील गोष्टी शक्यत: टाळाव्यात. कारण ही गोष्ट मुलांच्या मनात कायम एक भार, बोझ म्हणून कार्यरत असते. चुकून त्या क्षेत्रात आपले मूल यशस्वी नाही ठरले तर पैसा तर जातोच पण त्यासोबत कौटुंबिक स्वास्थ्यही बिघडते. मुलांचे मोठेच मानसिक खच्चीकरण होते व त्यातूनच अनेक विघातक पडसाद उमटताना दिसतात.
      करिअर निवडीला सहाय्यक ठरण्यासाठी आजकाल क्षमता चाचण्या म्हणजेच ॲप्टिट्युड टेस्ट तसेच विद्यार्थ्याचे व्यक्तिमत्व, आवडी-निवडी समजून घेण्यासाठी मानसशास्रीय चाचण्या उपलब्ध आहेत. आवश्यकता वाटल्यास तज्ञ व अनुभवी करिअर कौन्सेलरचे समुपदेशन-मार्गदर्शन घ्यावे. या चाचण्यांद्वारे विद्यार्थ्यांचा मानसपट म्हणजेच प्रोफाईल तयार होतो व त्यामुळे आपले अनेक संभ्रम दूर होऊन करिअरची दिशा ठरविणे सोईचे होऊ शकते.
-          डॉ. योगेश वानखेडे (कन्सल्टिंग सायकॉलॉजिस्ट)
-          संचालक माईंडसर्च कौन्सेलिंग
-          मो. 9881168509