Translate

Tuesday 26 May 2015

Importance of career counseling and aptitude test

करिअर निवडीकरिता अभिक्षमता व इतर मानसशास्त्रीय चाचण्यांद्वारे समुपदेशनाची आवश्यकता :
      व्यावसायिक सुख-समाधानावर जीवनातील आनंद व यश मोठ्या प्रमाणावर अवलंबून असते. आपली नोकरी किंवा व्यवसाय ही जीवनातील खूप महत्वाची गोष्ट असते. व्यवसायाच्या आधारावरच आपण कोण ? हे ठरत असते. व्यवसायामुळेच आपली सामाजिक ओळख निर्माण होते, त्यामुळेच सामाजिक व आर्थिक दर्जा प्राप्त होतो. निवडलेल्या व्यवसायात यश मिळाल्यास, समाधान लाभल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास उंचावतो. मात्र अपयश आल्यास नैराश्य येते व त्यासोबतच अनेक आर्थिक, कौटुंबिक, मानसिक समस्या उदभवतात. याकरिताच व्यवसायाची निवड खूप विचारपूर्वक केली पाहिजे. मात्र व्यवसायाची निवड ही आपल्याकडे अजूनही अगदी सहज घडून येणारी प्रक्रिया आहे. कधी पालकांच्या इच्छेनुसार तर कधी कोणी नातेवाईक, कोणी मित्र यांच्या सल्ल्यानुसार एखाद्या विद्याशाखेत प्रवेश घेतला जातो. या सर्व प्रक्रियेत शिक्षण घेणाऱ्या त्या विद्यार्थ्यास काय वाटते? कोणते शिक्षण घेण्याच्या किंवा कोणता व्यवसाय करण्याच्या विशेष क्षमता त्याच्यात आहेत? या गोष्टींचा बरेचदा विचारच केला जात नाही. आई-वडील आपल्या मुलांच्या किंवा मित्र आपल्या मित्राच्या समस्यांकडे नेहमीच तटस्थ वृत्तीने व वस्तुनिष्ठ भूमिकेतून पाहू शकत नाही. त्यांच्या नात्यातील भावनिक घटक हा मार्गदर्शनात अडथळा बनतो. तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी जीवनातील सर्वच क्षेत्रांचे ज्ञान त्यांना असतेच असेही नाही. त्यामुळे पालक आपल्या पाल्याला किंवा मित्र आपल्या मित्राला योग्य व वस्तुनिष्ठ मार्गदर्शन करू शकत नाही. म्हणूनच पालक, नातेवाईक किंवा मित्र हे व्यवसाय निवडीसाठी नेहमीच योग्य मार्गदर्शक ठरत नाहीत. बरेचदा मुलांना स्वतःमधील क्षमता, कुवती, बौद्धिक पातळी यांचा अंदाज नसतो. स्वतःच्या बुद्धिमत्तेचा अवास्तव आत्मविश्वास, पालकांचे दुर्लक्ष व मित्र मंडळीची संगत यामुळे अनेक मुले हूशार असुनही केवळ मार्गदर्शनाचे अभावी शैक्षणिक व व्यावसायिक दृष्ट्या विशेष उपलब्धी प्राप्त करतांना दिसत नाहीत.
      किशोरावास्थेच्या दरम्यान, म्हणजेच इयत्ता 10 वी, 12 वी च्या टप्प्यावर तज्ञ मानसशास्त्रज्ञांकडून व्यवसाय निवडी संदर्भात समुपदेशन घेतले गेले तर विद्यार्थ्याची शैक्षणिक व व्यावसायिक वाटचाल सुखकर होवू शकते. करिअर कौन्सेलिंग च्या या प्रक्रियेत अभिक्षमता चाचण्यांद्वारे कोणकोणत्या व्यवसायाशी निगडीत क्षमता त्या विद्यार्थ्यामध्ये आहेत, हे समजते. कोणता अभ्यासक्रम त्याला झेपवेल किंवा कोणता अधिक अवघड वाटेल, याबद्दलची माहिती मिळते. उदाहरणार्थ इंजिनीअरिंग, मेडिकल, प्रशासन, व्यवस्थापन, शिक्षक, मिडिया यासारख्या नेमक्या कोणकोणत्या क्षेत्रात विद्यार्थ्याला प्रगतीच्या संधी आहेत याची कल्पना येते. याचप्रमाणे त्याची अभिरुची मापन केल्याने कोणकोणत्या क्षेत्राबद्दल त्या विद्यार्थ्यास विशेष आवड आहे, हे समजते. ज्यामुळे त्या क्षेत्रात तो मन:पूर्वक काम करू शकेल का याबाबतचा अंदाज बांधता येतो. तसेच विविध व्यक्तिमत्व चाचण्यांद्वारे सदर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचे एकंदरीत स्वरूप समजून घेता येते. त्याच्या व्यक्तिमत्वातील प्रबळ स्थाने, दुर्बल स्थाने समजून घेता येतात. उदा. अंतर्मुखता, बहिर्मुखता, भावनिकता, स्व-आदर, आत्मविश्वास, कल्पकता, सामाजिकता इ. व्यक्तित्व गुणांची माहिती मिळते. वरील सर्व चाचण्यांद्वारे मिळणाऱ्या माहितीचे योग्य विश्लेषण करून व सोबतच विद्यार्थ्याची कौटुंबिक, आर्थिक बाजू समजून घेवून त्यास व्यवसाय निवडीबाबत समुपदेशन केले जाते. या सर्व प्रक्रियेमुळे सदर विद्यार्थ्यास योग्य अशी व्यावसायिक दिशा मिळते व त्याचे मार्गदर्शनाचे अभावी इतरत्र व्यर्थ जाणारे श्रम, वेळ व पैसा इ. गोष्टी वाचू शकतात.
      म्हणूनच एखाद्या शिक्षणशाखेची निवड किंवा उपजीविकेचे स्थान म्हणून एखाद्या व्यवसायाची निवड कोणाच्याही सहज सल्ल्यानुसार करण्यापेक्षा तज्ञ मानसशास्त्रज्ञांच्या समुपदेशन प्रक्रियेद्वारे केली तर ते व्यावसायिक सुख-समाधानाकरिता व एकूणच जीवनातील आर्थिक-सामाजिक उपलब्धीकरिता अधिक फायदेशीर ठरते.
     - प्रा. योगेश दे. वानखेडे, नाशिक
      (Consulting Psychologist)  
            Mo. 9881168509
            wankhedeyogesh2@gmail.com

No comments:

Post a Comment